कोल्हापूर : वनविभागातील वनरक्षक पदावर (Forest Guard) होणाऱ्या भरतीसाठी राज्यभरातून ४४ हजारांवर अर्ज आले आहेत. त्यातील कागदपत्रांची छाननी व शारीरिक चाचणी परीक्षा सध्या रणमळा येथील वनविभागाच्या (Forest Department) प्रादेशिक कार्यालयात सुरू आहे. १४ फेब्रुवारीपर्यंतही प्रक्रिया सरू राहणार आहे.
प्रधान वनसंरक्षक कार्यालयाकडून भरती कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यानुसार भरतीची प्रथम फेरी सुरू झाली आहे. त्यानुसार कोल्हापूर (Kolhapur), सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी २५० पदांवर वनरक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
रोज किमान २ ते ३ हजारांवर उमेदवारांच्या अर्जांची छाननी होत आहे. विविध आरक्षण व खुल्या वर्गातील उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांची शैक्षणिक अर्हता, उंची, वजन, धावणे क्षमता याची चाचणी सुरू आहे. अर्ज केलेल्यांपैकी ७० टक्के उमेदवार हे पदवीधर आहेत. उर्वरित बारावी पास आहेत. तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, पोलिस भरतीची तयारी केलेले उमेदवार आहेत. तर काहींनी एमबीए, संगणक प्रशिक्षण व उच्च शिक्षण घेतलेले आहे. यातून लेखी परीक्षा व मुलाखती होतील.
त्यानंतर अंतिम निवड होणार आहे. त्यासाठी अजूनही दोन महिने ही प्रक्रिया चालणार आहे. वनविभागाने २६ जणांचे पथक तैनात केले आहे. कागदपत्रे तपासणी व शारीरिक तपासणी झाल्यानंतर संबंधित उमेदवारांची संगणकीय प्रणालीतून नोंद घेतली जात आहे. पुढील टप्प्यात त्यांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली असल्यास तसा संदेश संबंधित उमेदवाराला दिला जाणार आहे.
मनुष्यबळ मिळणार
या भरती प्रक्रियेतून २५० वनरक्षक वनविभागाला मिळणार आहेत. त्यांनाही कोल्हापूर, सांगली, सातारा येथील वनहद्दीत तसेच वनप्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळेल. त्यामुळे वनकार्याला किमान मनुष्यबळ मिळणार आहे. त्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.