मुंबई | राज्यातील राज्य राखीव पोलिस दल, तुरुंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे.
लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प आज (27 फेब्रुवारी 2024) मांडला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या.
यामध्ये राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच दावोसमध्ये 19 कंपन्यांबरोबर करार झाले असून त्यांचा राज्याला मोठा फायदा होईल, असंही पवार यांनी सांगितलं. (Maharashtra Interim Budget 2024 ) तसेच महाराष्ट्रात येत्या काळात पोलिस शिपायांची 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत.
याबरोबरच अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
येत्या काळात होणाऱ्या निवडणुका ध्यानात घेत, कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली.
ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल, असेही नियोजन आखण्यात आले आहे
राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवीन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.