पुणे: नमो महारोजगार मेळाव्यात 20,000 पेक्षा जास्त पदांची भरती, त्वरित नोंदणी करा.. सर्व शैक्षणिक पात्रता धारकांना संधी | Pune Job Fair 2024





पुणे | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या २ मार्च रोजी बारामती येथे आयोजित मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १२० पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी आत्तापर्यंत सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे २० हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे. 



हा मेळावा विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. रिक्त पदांकरीता १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.


  ज्या उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या उद्योग आस्थापना https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration  या लिंकवर नोंदणी करुन रिक्तपदे मेळाव्यासाठी अधिसुचित करावीत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.



या महारोजगार मेळाव्यात विविध विभागाच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याव्दारे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. 



तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थादेखील सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांना याचा लाभ घेता येईल.



उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रिज्युम) व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी व आस्थापनांनी लाभ घ्यावा. 



अधिक माहितीसाठी पुणे विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने