पाचवी- आठवीची १८ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा! सोलापुरात २१८ केंद्रे; दरमहा मिळते ‘एवढी’ शिष्यवृत्ती




  सोलापूर : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी म्हणजेच १८ फेब्रुवारीला होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थ्यांसह राज्यातील आठ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. सोलापुरातील २१८ केंद्रांसह राज्यातील सहा हजार १८३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.




महाराष्ट्र राज्य परिक्षा परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. त्यात प्रत्येकी १५० गुणांचे दोन पेपर असतात. 




चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना (पाचवी व आठवीतील) परीक्षेला बसता यावे म्हणून सेस फंडातून रक्कम दिली जाते. 



सोलापूर जिल्ह्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १३३ तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८५ परीक्षा केंद्रे असणार आहेत. १८ जानेवारीला सकाळी साडेअकरा वाजता पहिला पेपर सुरू होईल. दुसरा पेपर दुपारी दोन ते साडेतीन यावेळेत होईल.


परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. राज्यातील ७७ हजार ७४० शाळांमधील इयत्ता पाचवीचे पाच लाख १० हजार ३७८ तर आठवीच्या २४हजार ५०४ शाळांमधील तीन लाख ८१ हजार ३२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 




आपल्या शाळांमधील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हावेत या हेतूने अनेक शाळांनी स्वतंत्र शिकवणी घेतल्याचीही उदाहरणे आहेत. सोलापूर जिल्हा परिषद व महापालिकेच्या किती शाळांमधील किती विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


परीक्षेचे स्वरूप असे असणार


पहिला पेपर : प्रथम भाषा व गणित असा असतो


दुसरा पेपर हा तृतीय भाषा (५० गुण) व बुद्धिमत्तेचा (१०० गुण) असतो


दोन्ही पेपर प्रत्येकी १५० गुणांचे असतात


प्रत्येक पेपरसाठी दीड तासांचा वेळ असणार आहे


पहिला पेपर सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन आणि दुसरा पेपर दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत होईल


परीक्षेची राज्याची स्थिती


इयत्ता विद्यार्थी परीक्षा केंद्रे


पाचवी ५,१०,३७८ ३,६१४


आठवी ३,८१,३२२ २,५६९


एकूण ८,९१,७०० ६,१८३


दोन वर्षे मिळते दरमहा शिष्यवृत्ती


परीक्षेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याला दरमहा पाचशे रुपये तर आठवीच्या विद्यार्थ्यास दरमहा साडेसातशे रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. २३ जुलै २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने ही रक्कम वाढविली आहे. वर्षातील दहा महिने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने