मुंबई | महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलिस दल, तुरूंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची मोठी भरती (Maharashtra Police Bharti 2024) होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात पोलीस भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
त्यानंतर उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष भरतीला सुरवात केली जाणार आहे. प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्याची विशेषत: प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीत देखील वाढ होत आहे. असे असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्याठिकाणी लागणार आहे.
Maharashtra Police Bharti 2024
शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने राज्यभरात पोलिस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे देखील पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरवात होईल, असेही गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे.